Thursday, April 15, 2010

पालकाची भजी - Palak Bhajji

Palak Pakoda in English

२ जणांसाठी (साधारण १० ते १२ भजी)
वेळ: २० मिनीटे

साहित्य:
२ ते अडीच कप भरडसर चिरलेली पालकाची पाने
१/४ कप कांदा, उभे पातळ काप
६ ते ७ टेस्पून बेसन
१ टेस्पून तांदूळ पिठ
१/२ टिस्पून आलेलसूण पेस्ट
५ ते ७ कढीपत्त्याची पाने, बारीक चिरून
१ टिस्पून तिळ (ऐच्छिक)
१ टिस्पून कसूरी मेथी
१/२ टेस्पून लाल तिखट किंवा गरजेनुसार
१/४ टिस्पून हळद
चिमूटभर खायचा सोडा
चवीपुरते मिठ
२ ते ३ टेस्पून पाणी
तेल, भजी तळण्यासाठी

कृती:
१) मोठ्या वाडग्यात चिरलेला पालक, कांदा आणि मिठ घालून मिक्स करावे. १० मिनीटे तसेच ठेवावे म्हणजे कांद्याला थोडे पाणी सुटेल.
२) नंतर त्यावर प्रथम एकूण बेसनपैकी ४ टेस्पून बेसन आणि तांदूळ पिठ पेरावे. १ टिस्पून तेल कडकडीत गरम करून पिठावर घालावे. २ मिनीटांनी हलकेच चमच्याने मिक्स करावे. अंदाज घेऊन उरलेले बेसनही घालावे.
३) आता उरलेले जिन्नसही घालावेत. (आलेलसूण पेस्ट, कसूरी मेथी, तिळ, लाल तिखट, हळद, सोडा, आणि थोडे मिठ) सर्व निट मिक्स करा. लागल्यास अगदी थोडे पाणी घाला आणि चिकटसर असा गोळा तयार करा. हे मिश्रण पातळ नको, घट्ट पण चिकटसर गोळा बनवा.
४) भजी तळण्यासाठी कढईत तेल तापवा आणि आच मिडीयम-हायवर ठेवा. छोटी छोटी बोंडं, गोल्डन ब्राऊन आणि कुरकूरीत होईस्तोवर तळा. तेल टिपण्यासाठी टिश्यु पेपरवर काढा.
गरमा गरम भजी टोमॅटो केचप, हिरवी चटणी किंवा लसणीच्या तिखटाबरोबर सर्व्ह करावी.

टीप्स:
१) पालकाबरोबर थोडी मेथी घातल्यास खुप छान चव येते.
२) १ टिस्पून गरम तेल भजीच्या पिठात घातल्याने भजी छान कुरकूरीत होतात.
३) भजी एकदम मोठ्या आचेवर किंवा कमी आचेवर तळू नयेत. मोठ्या आचेवर तळल्याने भजी बाहेरून लगेच ब्राऊन होतात पण आतमध्ये कच्च्याच राहतात. तसेच एकदम कमी आचेवर तळल्या तर तेलकट होतात. म्हणून नेहमी मिडीयम ते मिडीयम हायवर तळावे.
४) खायचा सोडा घातल्याने भजी हलक्या होतात. पण जास्त प्रमाणात सोडा घातल्यास भजी तेल पितात.
५) पाण्याचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त पडले तर मिश्रण पातळ होईल आणि भजी कुरकूरीत होणार नाहीत.

Labels:
Palak bhaji, Spinach Pakoda, Palak Pakoda

No comments:

Post a Comment