Tuesday, July 19, 2011

मटकीची उसळ - Matkichi usal

Matkichi Usal in English

वेळ: १/२ तास (मटकी भिजवून मोड आणणे वगळून)
वाढणी: ३ ते ४ जणांसाठी

matki usal, matakichi usal, matki usali, everyday cooking, kad dhanya, usal recipeसाहित्य:
१/२ कप मटकी
फोडणीसाठी: २ टेस्पून तेल, २ चिमटी मोहोरी, १/८ टीस्पून हिंग, १/४ टीस्पून हळद, १/२ टीस्पून लाल तिखट
४ ते ५ कढीपत्त्याची पाने
१/२ टीस्पून गोड मसाला (ऐच्छिक)
२ ते ३ आमसूलं
१ टेस्पून गूळ
चवीपुरते मीठ
२ ते ३ टेस्पून ओला नारळ
२ टेस्पून चिरलेली कोथिंबीर

कृती:
१) मटकी रात्रभर किंवा ८ ते १० तास पाण्यात भिजवून ठेवावी. ८-१० तासानंतर चाळणीवर उपसून निथळत ठेवावी. नंतर बारीक खडे किंवा कडक मटकी निवडून काढून टाकावी.
२) सुती कपडा घेउन त्यात मटकी घट्ट बांधून उबदार ठिकाणी ठेवावे. मोड यायला किमान १० ते १२ तास जातात. आणि थंडीचा मोसम असल्यास अजून जास्त वेळ लागू शकतो. (जर घरी ओवन असेल तर २०० F वर २ मिनिटे गरम करावा आणि बंद करून टाकावा. मटकी बांधलेली पुरचुंडी एका काचेच्या ताटलीत ठेवून मधल्या रॅकवर ठेवून द्यावे. एवढ्या उबेवर छान मोड येतात.)
३) मोड आलेली मटकी पाण्यात घालून लगेच उपसावी. मटकी जरा ओलसर असली कि फोडणीला घालताना करपत नाही.
४) कढईत तेल गरम करून मोहोरी, हिंग, हळद, लाल तिखट, आणि कढीपत्ता फोडणीस घालावा. उपसलेली मटकी घालावी आणि थोडावेळ परतावे. थोडे मीठ घालावे.
५) झाकण ठेवून मटकी शिजू द्यावी. मध्येमध्ये पाण्याचा हबका मारावा किंवा पाण्याचे ताट कढईवर ठेवावे. मटकी कोरडी होवू देवू नये. तसेच खूप पाणी एकाचवेळी घालू नये. यामुळे पाणचट चव लागते.
६) मटकी अर्धवट शिजली कि कोकम आणि गोडा मसाला घालावा. मटकी शिजत आली कि गूळ आणि पाणी घालावे. थोडावेळ उकळी काढून मटकी शिजू द्यावी. ओला नारळ आणि कोथिंबीर घालून मिक्स करावे.
गरम पोळीबरोबर सर्व्ह करावे.

No comments:

Post a Comment